दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध   

संजय राऊत यांचा दावा

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावली. अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांचा त्यांच्या एकत्र येण्याला विरोध आहे. राष्ट्रवादी एक झाली तर आपले राजकिय महत्त्व कमी होईल, अशी त्यांना भीती वाटते. शिवाय मोदी, शहा यांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले छोटे दुकान चालवायचे आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यावर चर्चा सुरू असून, शरद पवार यांनी हा निर्णय नव्या पिढीकडे सोपवला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी ठाकरे गटाचे खासदार राऊत यांना विचारले असता त्यांनी त्यातील विरोधाभास समोर आणला. अजित पवार गटाचे हे नेते आजही शरद पवार आमचे नेते आहेत असे सांगतात. शरद पवार यांच्या विचारधारेवर आमचा पक्ष उभा आहे, असे म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत, असेही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजे, असेही म्हणतात. पण, जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार होणार नाहीत. प्रत्येक जण आपापला राजकीय फायदा, तोटा त्यात पाहत असतो, असे राऊत म्हणाले.
 
महिला आयोगावर राजकीय व्यक्तीची नेमणूक करणे चुकीचे 
 
हगवणे प्रकरणावरून  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर सध्या टीकेची झोड उठली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी राजकारणातील सोय म्हणून कुणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही. हे एक घटनात्मक पद आहे. त्याच्यामुळे देशातील, राज्यातील महिलांवरच्या अत्याचारांना, अन्यायांना वाचा फुटते. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी अराजकीय व्यक्ती नेमायला हव्यात.

Related Articles